वटमुखत्यारपत्र / (Power of Attorney) कधी आणि का आवश्यक आहे? (When and Why is a Power of Attorney Necessary?)

आजच्या आधुनिक युगात अनेक वेळा आपल्याला विविध कारणांसाठी इतर व्यक्तींवर अवलंबून राहावे लागते. आर्थिक व्यवहार, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायालयीन प्रकरणे किंवा आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळी स्वतः उपस्थित राहणे शक्य नसते. अशा परिस्थितीत, कायदेशीर दस्तऐवज म्हणून वटमुखत्यारपत्र (Power of Attorney – POA) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney – POA) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जो एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने कायदेशीर निर्णय घेण्याचा अधिकार देतो. हे अधिकार कायमस्वरूपी किंवा काही विशिष्ट कालावधीसाठी दिले जाऊ शकतात.

भारतात वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) चा वापर मुख्यतः आर्थिक व्यवहार, मालमत्ता व्यवस्थापन, न्यायालयीन प्रकरणे आणि इतर वैयक्तिक गरजांसाठी केला जातो. हा कायदेशीर दस्तऐवज तयार करताना पुर्ण खबरदारी घेऊन योग्य प्रकारे तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्याचा चुकीचा वापर झाल्यास मोठे आर्थिक व कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात.

म्हणूनच, वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) च्या प्रकारांबद्दल, त्याच्या आवश्यकतेबद्दल आणि कायदेशीर तरतुदींबद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) म्हणजे काय? (What is Power of Attorney?)

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) कायदा, 1882 हा  कायदा दि. 1 मे 1882 रोजी भारतात वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) च्या (प्रतिनिधीकत्वाच्या अधिकारपत्र) नियमनासाठी लागू करण्यात आला आहे.

कलम 1 A नुसार “वटमुखत्यारपत्र (Power of Attorney)” म्हणजे असा कोणताही दस्तऐवज जो एखाद्या व्यक्तीस (ॲटर्नी ) दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने कायदेशीर कामे करण्याचा अधिकार देतो.

कलम 2 – वटमुखत्यारपत्र (Power of Attorney – POA) अंतर्गत अधिकारांची अंमलबजावणी (Execution under power-of-attorney)
  • वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) मिळालेल्या व्यक्तीला (donee) जर योग्य वाटले, तर तो त्या अधिकारानुसार कोणतेही कागदपत्र तयार करू शकतो किंवा कोणतेही कार्य स्वतःच्या नावाने, स्वाक्षरीने आणि आवश्यक असल्यास सीलसह पूर्ण करू शकतो.
  • हा अधिकार त्याला वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देणाऱ्या व्यक्तीने (donor) दिलेला असतो. अशा प्रकारे केलेले प्रत्येक कार्य कायद्याच्या दृष्टिकोनातून वैध मानले जाते, जसे की ते वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देणाऱ्या व्यक्तीने स्वतःच केले आहे.
कलम 3 – ॲटर्नीच्या अज्ञानात झालेला व्यवहार वैध ठरतो (Payment by attorney under power, without notice of death, etc., good.)
  • जर एखादी व्यक्ती वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) च्या आधारे काही व्यवहार करत असेल आणि त्या व्यक्तीला मूळ धारकाचा (donor) मृत्यू, मानसिक असंतुलन, दिवाळखोरी किंवा अधिकारपत्राचा रद्दबातल होणे याची माहिती नसेल, आणि तो चांगल्या भावनेने केला असेल तर तो व्यवहार कायदेशीरदृष्ट्या वैध ठरेल.
  • तथापि, अशा व्यवहारामुळे प्रभावित व्यक्तीस कायदेशीर उपाय उपलब्ध राहतील.
कलम 4 – मूळ वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) दस्तऐवज न्यायालयात जमा करण्याची तरतूद (Deposit of original instruments creating powers-of-attorney)
  • जर वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) चा दस्तऐवज शपथपत्र (affidavit) किंवा अधिकृत प्रमाणपत्रासह तयार केला असेल, तर तो उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालयात जमा केला जाऊ शकतो.
  • अशा दस्तऐवजांचे स्वतंत्र रेकॉर्ड ठेवले जाते , आणि कोणतीही व्यक्ती त्याची तपासणी करू शकेल; आणि विनंतीनुसार त्याची प्रमाणित प्रत त्याला दिली जाईल.
  • जमा केलेल्या दस्तऐवजाची प्रमाणित प्रत (certified copy) मिळवता येते, आणि ती कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते.
कलम 5 – विवाहित महिलांचे वटमुखत्यारपत्र (Power-of-attorney of married women)
  • हा कायदा, पुर्ण वयाच्या विवाहित महिलेला, जणू ती अविवाहित आहे असे मानून, एक नॉन-टेस्टामेंटरी कागदपत्र तयार करून तिच्या वतीने ॲटर्नी  नियुक्त करण्याचा अधिकार देतो. हे कागदपत्र किंवा अन्य कोणतेही कार्य जे ती स्वतः करू शकते, त्यासाठी ती ॲटर्नी  नियुक्त करू शकते. ह्या कायद्यातील वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) तयार करण्यासंबंधी असलेले नियम, ह्या प्रकरणातही लागू होतील.

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) हा कायदेशीर दस्तऐवज असून, यात एखादी व्यक्ती (Donor) आपल्या विश्वासू व्यक्तीला (Donee) त्याच्या वतीने काम करण्याचा अधिकार देते.

यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असतो:

  • कोणत्या अधिकारांसाठी हे पत्र दिले जात आहे?
  • कोणत्या कालावधीसाठी हे पत्र वैध राहील?
  • प्रतिनिधी कोणते निर्णय घेऊ शकतो?
  • वटमुखत्यारपत्र रद्द करण्याची प्रक्रिया काय आहे?

सामान्यतः पुर्ण केल्या जाणाऱ्या वटमुखत्यारपत्राचे प्रकार (Types of Power of Attorney)

1.         सर्वसाधारण वटमुखत्यारपत्र (General Power of Attorney):
  • यामध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सर्वसाधारण अधिकार प्रदान करतो. उदा. आर्थिक व्यवहार, मालमत्ता विक्री, कर भरपाई, बँकिंग व्यवहार इत्यादींसाठी.
2.         विशेष वटमुखत्यारपत्र (Special Power of Attorney):
  • यामध्ये प्रतिनिधीस काही विशिष्ट कार्यांसाठी अधिकार दिले जातात. उदा. केवळ एका विशिष्ट व्यवहारासाठी, जसे की मालमत्ता विक्री, बँकेशी संबंधित विशिष्ट व्यवहार इत्यादी.
  • विशिष्ट कार्यानंतर प्राप्त झालेले अधिकार संपुष्टात येतात.
3.         कायमस्वरूपी वटमुखत्यारपत्र (Durable Power of Attorney):
  • याप्रकारे केलेला दस्तऐवज विशेषतः वृद्ध किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी फायदेशीर ठरतो. जर वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देणारी व्यक्ती नंतर शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या असमर्थ झाल्यास देखील विशिष्ट परिस्थितीत वैध राहते.
  • आरोग्य आणि आर्थिक निर्णय घेण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
4.         आरोग्यविषयक वटमुखत्यारपत्र (Medical Power of Attorney):
  • हा दस्तऐवज आरोग्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वापरला जातो.
  • जर एखादी व्यक्ती वैद्यकीय कारणांमुळे निर्णय घेण्यास असमर्थ असेल, तर तिच्या वतीने निवडलेला प्रतिनिधी वैद्यकीय निर्णय घेऊ शकतो.
5.        नोंदणीकृत वटमुखत्यारपत्र (Registered Power of Attorney):
  • जर वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) स्थावर मालमत्तेशी संबंधित असेल, तर त्याची नोंदणी करणे बंधनकारक असते.
  • यासाठी सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
6.        तात्पुरता वटमुखत्यारपत्र (Temporary Power of Attorney):
  • हे वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) काही मर्यादित कालावधीसाठीच वैध असते आणि ठरावीक काम पुर्ण झाल्यावर आपोआप रद्द होते.
  • उदा. एखादी व्यक्ती परदेशात असताना तिच्या वतीने काही महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी या  वटमुखत्यारपत्रा द्वारे अधिकार दिले जाऊ शकतात.

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) कधी आवश्यक आहे? (When is a Power of Attorney Necessary?)

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) हा कायदेशीर दस्तऐवज पुढील काही परिस्थितींमध्ये आवश्यक ठरू शकतो:

1. परदेशात राहणाऱ्या भारतीयांकरिता (NRI)
  • जर कोणी परदेशात राहत असेल आणि भारतातील मालमत्ता व्यवस्थापन, बँकिंग किंवा अन्य व्यवहार पाहणे कठीण असेल, तर विश्वासू व्यक्तीला वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देणे सोयीस्कर ठरते.
  • उदा. एखाद्या NRI व्यक्तीला भारतातील जमिनीसंबंधी व्यवहार करायचा असल्यास, तो आपल्या नातेवाईकास हा अधिकार देऊ शकतो.
2. व्यावसायिक कारणांसाठी
  • मोठ्या उद्योगांमध्ये मालक किंवा भागीदार अनेक ठिकाणी प्रवास करत असतात. अशा वेळी त्यांच्या अनुपस्थितीत व्यवसायिक निर्णय घेण्यासाठी वटमुखत्यारपत्र (Power of Attorney)चा उपयोग करतात.
  • उदा. जर एखाद्या कंपनीच्या मालकाला स्वतः सर्व व्यवहार करणे शक्य नसेल, तर तो व्यवस्थापकास विशेष वटमुखत्यारपत्र ( Special Power of Attorney) देऊ शकतो.
3. वयोवृद्ध आणि शारीरिक दृष्ट्या असमर्थ व्यक्तींकरिता
  • वृद्ध व्यक्तींना बँकिंग, आर्थिक व्यवहार किंवा मालमत्ता व्यवस्थापनासाठी आणि  एखादी व्यक्ती गंभीर आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीस दुसऱ्या विश्वासू व्यक्तीकडून मदतीची गरज भासू शकते. अशा वेळी हे  वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) उपयुक्त ठरते.
  • उदा. वृद्ध पालक आपल्या मुलांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देऊ शकतात.
4. मालमत्ता व्यवहारांसाठी
  • जमीन, घर किंवा अन्य स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी व्यक्ती स्वतः उपस्थित राहू शकत नसेल, तर ती दुसऱ्या व्यक्तीस हा अधिकार देऊ शकते.

  • उदा. जर एखाद्याने दुसऱ्या शहरात किंवा राज्यात मालमत्ता विकत घेतली असेल, तर तो आपल्या नातेवाईकाला वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देऊन व्यवहार पुर्ण करू शकतो.

5. न्यायालयीन प्रकरणांसाठी
  • जर एखाद्या व्यक्तीला न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, तर ती दुसऱ्या व्यक्तीस कायदेशीर प्रतिनिधी म्हणून वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देऊ शकते.
  • उदा. परदेशात राहणाऱ्या व्यक्तीने भारतातील न्यायालयात चालू असलेल्या खटल्यात हजर राहण्यासाठी वकिलास हा अधिकार दिल्यास, वकील त्या व्यक्तीच्या वतीने न्यायालयात कार्य करू शकतो.

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? (Things to Keep in Mind While Granting a Power of Attorney)

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) द्वारे अधिकार देताना काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घेणे गरजेचे आहे. चुकीचा वापर टाळण्यासाठी आणि भविष्यात होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या.

1.  विश्वासू व्यक्तीची निवड:

वटमुखत्यारपत्राद्वारे अधिकार पुर्णपणे विश्वासू आणि जबाबदार व्यक्तीला द्यावेत. योग्य व्यक्तीची निवड न केल्यास मालमत्ता किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. शक्यतो जवळचे नातेवाईक किंवा अनुभवी वकील यांना हा अधिकार द्यावा.

फसवणूक किंवा गैरवापर टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.

2.  वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) लिखित स्वरूपात असावे:

कायद्याने मान्य असलेला कोणताही दस्तऐवज तोंडी स्वरूपात ग्राह्य धरला जाईलच असे नाही. वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) योग्य प्रकारे लिखित स्वरूपात तयार करून स्वाक्षरी आणि साक्षीदारांची उपस्थिती असणे महत्त्वाचे आहे.

3. नोंदणी (Registration) करणे अनिवार्य आहे का याची खात्री करा

स्थावर मालमत्ता संबंधित वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) हा कायद्याने नोंदणी (Registration) करणे बंधनकारक आहे. सब-रजिस्ट्रार कार्यालयात त्याची नोंदणी करून वैधता सुनिश्चित करावी.

4. स्पष्ट अटी आणि मर्यादा नमूद करा

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) मध्ये कोणते अधिकार दिले जात आहेत, याची स्पष्ट माहिती द्यावी. कोणतेही अनावश्यक किंवा अनियंत्रित अधिकार देणे टाळावे. उदा. मालमत्ता व्यवहारासाठी केवळ खरेदी किंवा विक्रीसाठी मर्यादित अधिकार द्यावा.

5. वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) च्या कालावधीचे ठराविक निर्धारण करा

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) कायमस्वरूपी देण्याऐवजी, तो निश्चित कालावधीसाठी मर्यादित ठेवावा. उदा. जर परदेशी जाताना हा अधिकार दिला असेल, तर परत आल्यावर तो रद्द करावा.

6. रद्द करण्याची तरतूद (Revocation Clause) ठेवा

भविष्यात कोणत्याही कारणास्तव वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) रद्द करावयाचे  असल्यास त्यासाठी योग्य तरतूद असावी. जर प्रतिनिधी वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) चा गैरवापर करेल, असे वाटल्यास वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवावा. रद्द करण्यासाठी “Revocation Deed” तयार करून संबंधितांना त्याची माहिती द्यावी.

7. साक्षीदारांची उपस्थिती:

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) तयार करताना दोन विश्वसनीय साक्षीदार असणे आवश्यक आहे. यामुळे भविष्यात एखाद्या वादविवादाच्या वेळी त्याचे महत्त्व पटवून देता येते.

8. कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्या

दस्तऐवज तयार करण्याआधी आणि तो वैधतेसाठी सादर करण्याआधी अनुभवी वकिलांचा सल्ला घ्यावा. कायदेशीर चुका टाळण्यासाठी वकीलांच्या मदतीने दस्तऐवज तयार करून घ्या. अशा वेळी www.asmlegalservices.in किंवा www.lifeandlaw.in द्वारे सदर लेख लिहिणाऱ्या ॲड. अब्दुल मुल्ला यांचा सल्ला घेऊ शकता

9. गैरवापर टाळण्यासाठी काळजी घ्या

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देताना दस्तात प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक नमूद करावी आणि कोणताही त्रुटी राहणार नाही याची खात्री करावी. शक्य असल्यास, दिलेल्या अधिकारांचे नियमित निरीक्षण करावे.

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) कशी रद्द करावी ?

जर दिलेली वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) रद्द करायची असेल, तर पुढील पद्धतीने ती  रद्द करता येते :

  • लेखी स्वरूपात Revocation Deed तयार करणे.
  • संबंधित पक्षांना आणि नोंदणी कार्यालयाला याबाबत कळवणे.
  • न्यायालयात अर्ज करून आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करणे.
  • स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर करून रद्द करण्याची माहिती देणे.

विशेष बाबी लक्षात ठेवा (Special Points to Remember)

✅ जर वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) विशेष (Special) स्वरूपाचा असेल, तर तो ठरावीक काम पूर्ण झाल्यानंतर आपोआप निष्क्रिय होतो.
✅ जर वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) देणारी व्यक्ती मृत्यू पावली, तर ते  आपोआप रद्द होते .
✅ गंभीर फसवणूक किंवा गैरवापर झाल्यास, वकिलांचे मार्फत नोटीस पाठवून  व प्रसंगी न्यायालयात दावा दाखल करून  वटमुखत्यार पत्र रद्द करण्याची मागणी करता येते.

समारोप

वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे, जो व्यक्तीच्या अनुपस्थितीत किंवा असमर्थतेमुळे तिच्या वतीने महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मदत करतो. मात्र, हा दस्तऐवज तयार करताना आणि वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण चुकीच्या व्यक्तीला अधिकार दिल्यास मोठे आर्थिक आणि कायदेशीर नुकसान होऊ शकते. म्हणूनच, योग्य कायदेशीर सल्लागाराचा सल्ला घेणे अनिवार्य ठरते.

अनुभवी कायदेशीर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने वटमुखत्यारपत्र (Power of Attorney) तयार केल्यास त्यातील अटी स्पष्ट राहतात, संभाव्य धोके टाळता येतात आणि भविष्यातील अडचणींवर योग्य नियंत्रण ठेवता येते. तसेच, जर POA चा गैरवापर झाल्यास ते रद्द किंवा कायदेशीर कारवाई करण्यासाठीही तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते. त्यामुळे, कायदेशीर सुरक्षिततेसाठी आणि हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, POA संबंधित कोणताही निर्णय घेताना विश्वासार्ह वकिलाचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा वेळी www.asmlegalservices.in किंवा www.lifeandlaw.in द्वारे सदर लेख लिहिणाऱ्या ॲड. अब्दुल मुल्ला यांचा सल्ला  घेऊन योग्य निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते.

Scroll to Top