Loading ...

Life & Law

RECENT NEWS

Mutual Consent Divorce: Procedure and Essential Conditions – परस्पर संमतीने घटस्फोट : प्रक्रिया आणि आवश्यक अटी

आजच्या आधुनिक युगात विवाह जसे महत्वाचे आहेत, तसंच काही वेळा घटस्फोट देखील अपरिहार्य ठरतो. विवाहित जीवनातील वैचारिक मतभेद, गैरसमज, किंवा कोणत्याही कारणामुळे एकत्र राहणे अशक्य झाल्यास परस्पर संमतीने घटस्फोट हा एक सभ्य आणि कायदेशीर मार्ग ठरतो. घटस्फोट हा आयुष्याचा शेवट नसून नव्या सुरुवातीचा एक भाग असतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

परस्पर संमतीने घटस्फोट घेताना कायदेशीर प्रक्रिया, अटी, आणि आवश्यक कागदपत्रे यांची योग्य माहिती असणे अत्यावश्यक आहे.या लेखाचा उद्देश  परस्पर संमतीने घटस्फोट घेऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्यांना त्याबाबतची स्पष्ट आणि सोपी माहिती देणे हा आहे  जेणेकरून त्यांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये.

हिंदू कायद्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोट ( (Mutual Consent Divorce under Hindu Law)

A. लागू कायदा (Applicable Law)

हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मीय दांपत्यांसाठी परस्पर संमतीने घटस्फोट Hindu Marriage Act, 1955 च्या कलम 13B अंतर्गत दिला जातो. या तरतुदीमध्ये काही अटी पूर्ण झाल्यास पती-पत्नी परस्पर संमतीने आपला विवाह संपुष्टात आणू शकतात.

B. पात्रता निकष (Eligibility Criteria)

  1. किमान विवाह कालावधी — घटस्फोटासाठी अर्ज करण्याआधी पती-पत्नी यांचा किमान एक वर्षाचा विवाह झालेला असावा.
    → याचा उद्देश म्हणजे दोघांनी वैवाहिक जीवनासाठी पुरेसा वेळ दिलेला असावा.

  2. वेगळे राहण्याचा कालावधी — घटस्फोटासाठी अर्ज करण्याआधी पती-पत्नी किमान एक वर्ष वेगळे राहत असणे आवश्यक आहे.

  3. परस्पर संमती — पती-पत्नी दोघांनाही हे मान्य असले पाहिजे की विवाह कायम राहू शकत नाही आणि समेटाची कोणतीही शक्यता नाही.

C. कायदेशीर प्रक्रिया (Legal Process)

टप्पा 1 : कौटुंबिक न्यायालयात एकत्रित अर्ज (Joint Petition in Family Court)

  • पती-पत्नी मिळून कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करतात.

  • अर्जामध्ये पुढील माहिती असते:

    • विवाहाचा तपशील (तारीख, स्थळ)

    • वेगळे राहण्यामागची कारणे

    • परस्पर करार , माहिती — जसे की भत्ता (alimony), मुलांचा ताबा (child custody), मालमत्तेचे विभाजन (property division) इ.

टप्पा 2 : पहिली सुनावणी (First Motion Hearing)

  • न्यायालय अर्जाची पाहणी करते व पती-पत्नींचे जबाब नोंदवते.

  • सर्व अटी पूर्ण झाल्यास व संमती स्वेच्छेची असल्याचे न्यायालय पाहिल्यास पहिली सुनावणी मंजूर होते.

टप्पा 3 : प्रतीक्षा कालावधी (Cooling-Off Period)

  • न्यायालय 6 महिन्यांचा कालावधी देते, जेणेकरून पती-पत्नी पुन्हा विचार करू शकतील किंवा एकत्र येऊ शकतील.

टप्पा 4 : प्रतीक्षा कालावधी माफ करणे (Waiver of Cooling-Off Period)

  • पती-पत्नी दोघांनीही घटस्फोटच हवे असल्यास व कोणताही समेट शक्य नसेल तर 6 महिन्यांचा कालावधी माफ करण्यासाठी अर्ज करू शकतात.

  • परिस्थितीनुसार न्यायालय निर्णय घेते.

टप्पा 5 : दुसरी सुनावणी (Second Motion Hearing)

  • प्रतीक्षा कालावधीनंतर किंवा त्याच्या माफीनंतर, दोघे न्यायालयात हजर राहून आपली संमती पुन्हा नोंदवतात.

  • न्यायालय सर्व अटी योग्य असल्याचे पाहिल्यानंतर घटस्फोटाचा हुकुम (Decree of Divorce) देते.

मुस्लिम कायद्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोट (Mutual Consent Divorce under Muslim Law)

A. लागू कायदा (Applicable Law)

भारतात मुस्लिम व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने घटस्फोटाची प्रक्रिया मुस्लिम वैयक्तिक कायदा (Muslim Personal Law) अंतर्गत केली जाते.
परस्पर संमतीने घटस्फोट प्रामुख्याने दोन प्रकारांनी दिला जातो :

  1. खुला (Khula)

  2. मुबारत (Mubarat)

B. परस्पर संमतीने घटस्फोटाचे प्रकार (Types of Mutual Consent Divorce)

1. खुला (Khula)

  • पत्नीच्या पुढाकाराने दिला जाणारा घटस्फोट.

  • यामध्ये पत्नी आपल्या पतीची संमती घेऊन घटस्फोट मागते.

  • पत्नी काही वेळा आपले मेहर (Mehr) परत देण्याचे मान्य करते.

  • पती खुला स्वीकारल्यावर घटस्फोट वैध होतो.

2. मुबारत (Mubarat)

  • पती-पत्नी दोघांच्याही सहमतीने घेतला जाणारा घटस्फोट.

  • यामध्ये दोघेही वेगळं होण्यास तयार असतात.

  • सामान्यतः मेहर परत देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, मात्र काही वेळा दोघांच्या संमतीने होऊ शकतो.

C. प्रक्रिया (Process)

पायरी 1: परस्पर करार (Agreement Between Spouses)

  • पती-पत्नी एकत्र बसून घटस्फोटासंदर्भातील सर्व अटी ठरवतात.

  • यात आर्थिक बाबी, मेहर, मुलांच्या ताब्याचा प्रश्न यांचा समावेश असतो.

पायरी 2: साक्षीदारांची भूमिका (Role of Witnesses)

  • दोन प्रौढ मुस्लिम साक्षीदारांची उपस्थिती बंधनकारक असते.

  • साक्षीदारांच्या उपस्थितीत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडते.

पायरी 3: कागदपत्री प्रक्रिया व नोंदणी (Documentation and Registration)

  • पारंपरिक पद्धतीनुसार लेखी करार बंधनकारक नसला तरी, सुस्पष्टतेसाठी लेखी करार करणे योग्य ठरते.

  • आजकाल कायदेशीर ओळख व नोंदणीसाठी घटस्फोटाची नोंदणी करणे शिफारसीय आहे.

पायरी 4: न्यायालयीन मान्यता (Court Validation – जर गरज भासली तर)

  • पती किंवा पत्नी पैकी कोणीही घटस्फोटास मान्यता देण्यासाठी न्यायालयाचा आधार घेऊ शकतो.

  • यामुळे पुढील विवाह, मालमत्ता हक्क यासाठी अधिकृत पुरावा तयार होतो.

ख्रिश्चन कायद्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोट (Mutual Consent Divorce under Chritian Law)

A. लागू कायदा (Applicable Law)

भारतीय घटस्फोट अधिनियम, 1869 च्या कलम 10A अंतर्गत ख्रिश्चन दांपत्यांना परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याची परवानगी आहे.

B. पात्रता निकष (Eligibility Criteria)

  1. किमान विवाहाचा कालावधी — घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती-पत्नी यांचे किमान दोन वर्षांपासून विवाह झालेले असणे आवश्यक आहे.
    → याचा उद्देश म्हणजे दोघांनी एकमेकांना समजून घेण्यास पुरेसा वेळ दिला आहे की नाही हे पाहणे.

  2. वेगळे राहण्याचा कालावधी — घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान दोन वर्षांपासून पती-पत्नी वेगळे राहत असणे आवश्यक आहे.

  3. परस्पर संमती — पती-पत्नी दोघांनाही हे मान्य असले पाहिजे की त्यांचे वैवाहिक संबंध पूर्णपणे तुटले आहेत आणि घटस्फोट हा दोघांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

C. कायदेशीर प्रक्रिया (Legal Process)

पायरी 1 : एकत्रित अर्ज दाखल करणे (Filing a Joint Petition)

  • पती-पत्नी मिळून त्यांच्या रहिवासाच्या जिल्हा न्यायालयात एकत्रित अर्ज दाखल करतात.

  • अर्जामध्ये खालील माहिती असते:

    • विवाहाची माहिती (तारीख, स्थळ)

    • वेगळे राहण्यामागची कारणे

    • दोघांमध्ये झालेला करार – जसे की भत्त्याबाबत (alimony), मुलांच्या ताब्याबाबत (child custody), मालमत्तेच्या विभागणीबाबत (property division) इ.

पायरी 2 : न्यायालयात दोघांचे जबाब (Statements Recorded in Court)

  • दोघेही न्यायालयात उपस्थित राहून आपापले जबाब देतात.

  • न्यायालय हे पाहते की संमती स्वेच्छेने व कोणत्याही दबावाशिवाय दिलेली आहे की नाही.

पायरी 3 : विचार करण्याचा कालावधी (Cooling-Off Period)

  • भारतीय घटस्फोट अधिनियम, 1869  मध्ये स्पष्ट असा विचार करण्याचा कालावधी दिलेला नाही.

  • परंतु, काही वेळा न्यायालय दोघांना पुन्हा एकत्र यायची संधी देण्यासाठी प्रकरण पुढे ढकलते.

पायरी 4 : घटस्फोटाचा आदेश (Decree of Divorce)

  • न्यायालय हे पाहते की विवाह तुटलेला आहे आणि विभाजनाच्या अटी न्याय्य व योग्य आहेत.समाधान झाल्यावर न्यायालय घटस्फोटाचा अंतिम आदेश देते.

 

पारसी कायद्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोट (Mutual Consent Divorce under Parasi Law)

A. लागू कायदा (Applicable Law)

पारसी विवाह आणि घटस्फोट अधिनियम, 1936 (Parsi Marriage and Divorce Act, 1936) च्या कलम 32B अंतर्गत परस्पर संमतीने घटस्फोटाची तरतूद आहे. या कायद्याअंतर्गत पारसी पती-पत्नी आपला विवाह कायदेशीर पद्धतीने परस्पर संमतीने संपुष्टात आणू शकतात.

B. पात्रता निकष (Eligibility Criteria)

  1. किमान विवाह कालावधी — घटस्फोटासाठी अर्ज करण्याअगोदर पती-पत्नी यांचा किमान एक वर्षाचा विवाह झालेला असावा.
  2. वेगळे राहण्याचा कालावधी — घटस्फोटासाठी अर्ज करण्याअगोदर पती-पत्नी किमान एक वर्ष वेगळे राहत असणे आवश्यक आहे.
  3. परस्पर संमती — पती-पत्नी दोघांनाही मान्य असले पाहिजे की त्यांच्या वैवाहिक नात्यामध्ये आता समेटाची कोणतीही शक्यता उरलेली नाही आणि विवाह कायम ठेवणे अशक्य आहे.

C. कायदेशीर प्रक्रिया (Legal Process)

टप्पा 1 : एकत्रित अर्ज दाखल करणे (Filing a Joint Petition)

  • कलम 32B अंतर्गत पती-पत्नी एकत्रित अर्ज मॅट्रीमोनियल कोर्टात (Matrimonial Court) दाखल करतात.
  • अर्जामध्ये पुढील माहिती असते :
    • दोघांनीही परस्पर संमतीने विवाह समाप्त करण्याचे ठरवले आहे.
    • भत्ता (alimony), मुलांचा ताबा (child custody), मालमत्तेचे विभाजन (property division) यासंबंधी करार.

टप्पा 2 : न्यायालयीन प्रक्रिया (Court Proceedings)

  • न्यायालयात दोघांनीही प्रत्यक्ष हजर राहून आपली विधीवत जबाबदारी नोंदवावी लागते.
  • न्यायालय तपासणी करते की :
    • संमती स्वेच्छेची आहे की नाही.
    • विवाह कायम ठेवणे अशक्य आहे का.
    • परस्पर करार योग्य व न्याय्य आहे का.

टप्पा 3 : थंडावणी कालावधी (Cooling-Off Period)

  • न्यायालय गरज असल्यास प्रकरण काही दिवसांसाठी तहकूब करू शकते, जेणेकरून दोघांना आपला निर्णय पुन्हा विचार करता येईल.

टप्पा 4 : घटस्फोटाचा हुकुम (Decree of Divorce)

  • न्यायालयास जर सर्व अटी व निकष पूर्ण वाटले तर घटस्फोटाचा अंतिम आदेश (Decree of Divorce) दिला जातो आणि विवाह कायदेशीररित्या संपुष्टात येतो.

समारोप

परस्पर संमतीने घटस्फोट ही एक सोपी व जलद प्रक्रिया असली तरी ती पूर्णपणे कायदेशीर नियमांनुसार पार पडणे आवश्यक आहे. दाम्पत्यांमध्ये परस्पर सहमती झाल्यानंतर देखील घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक बाबी, कागदपत्रांची पूर्तता व कायदेशीर अटी पाळाव्या लागतात. घटस्फोटानंतरची मालमत्तेची विभागणी, मुलांची जबाबदारी, भत्त्याचा मुद्दा किंवा भविष्यातील अधिकार यांसारख्या गोष्टी योग्य पद्धतीने निश्चित होणे गरजेचे असते.

म्हणूनच या प्रक्रियेत योग्य व तज्ज्ञ वकीलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कायदेशीर मार्गदर्शनामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, न्याय्य व नियमबद्ध राहते. यामुळे भविष्यात कोणत्याही वादाची किंवा गैरसमजाची शक्यता कमी होते.अशा वेळी  www.asmlegalservices.in , www.knowdivorce.com  किंवा www.lifeandlaw.in द्वारे सदर लेख लिहिणाऱ्या ॲड. अब्दुल मुल्ला यांचा सल्ला घेणे महत्वपूर्ण ठरू शकते

RECENT POSTS

CATEGORIES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Life And Law Blogs

Life & law provides valuable insights by simplifying complex legal concepts and connecting them to real-life experiences …read more

Why I write

At Life & law, my mission is simple. to make the law accessible and empower people with knowledge to confidently face life’s challenges …read more

Copyright BlazeThemes. 2025