Trending
सध्याच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे घटस्फोटाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय जसा महत्त्वाचा असतो, तसाच घटस्फोटाचा निर्णय देखील खूप विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक घेतला गेला पाहिजे. घटस्फोट म्हणजे केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, त्यामागे भावनिक, आर्थिक आणि मानसिक तयारी देखील तितकीच महत्त्वाची असते.
घटस्फोट दाखल करण्यापूर्वी काही आवश्यक बाबींची तयारी करणे, योग्य माहिती गोळा करणे, आणि स्वतःला भावनिकदृष्ट्या तयार करणे आवश्यक असते. या लेखाचा उद्देश घटस्फोटाच्या प्रक्रियेला सामोरे जाताना कोणती पावले उचलावी, कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि स्वतःला कसे सक्षम करावे या बद्दल माहिती देणे हा आहे.
घटस्फोट हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक टप्पा असतो. त्यामुळे या टप्प्यावर स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करणे फार गरजेचे असते. अशा प्रसंगी स्पष्टता आणि आत्मसन्मान टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्याला या प्रक्रियेतून सावरणे सुलभ होते.
आपल्या भावना स्वीकारा – घटस्फोटानंतर दुःख, राग, चिंता, गोंधळ यांसारख्या भावना येणे नैसर्गिक आहे. या भावना दडपून न ठेवता त्यांना स्वीकारा. घटस्फोटाची कारणे आणि पुढील आयुष्याची दिशा याचा विचार करा. स्वतःला वेळ द्या आणि भावनिकदृष्ट्या सावरण्याची संधी द्या. भावना स्वीकारणे हे मानसिक मजबुतीकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे.
आधार मिळवा – घटस्फोटाच्या काळात भावनिक आधार खूप महत्त्वाचा असतो. विश्वासू मित्र, कुटुंबीय किंवा समुपदेशक यांच्याशी संवाद साधा. आपल्या भावना शेअर करा. गरज असल्यास समुपदेशकांची मदत घ्या .असे मजबूत आधार मिळाल्याने मानसिक ओझे हलके होते आणि सावरण्यास मदत होते.
दोष देण्याचा खेळ टाळा – घटस्फोटाच्या काळात एकमेकांना दोष देणे टाळा. त्यामुळे वाद वाढतात आणि मानसिक त्रास होतो. भूतकाळ विसरून भविष्यात कसे पुढे जायचे यावर लक्ष द्या. क्षमा करा आणि संवाद सौम्य ठेवा. विशेषतः मुलांसमोर शांतता राखा. दोष न देणे हे भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
घटस्फोटाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी स्वतःचे हक्क सुरक्षित राहतील यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक ती कायदेशीर तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या आर्थिक स्थितीची माहिती घ्या – घटस्फोटाच्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्वतःच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट माहिती ठेवणे. यासाठी आपली सर्व मालमत्ता, कर्जे, उत्पन्न आणि मासिक खर्च यांची यादी तयार करा. यामध्ये वैयक्तिक मालमत्ता आणि विवाहित आयुष्यात मिळवलेली संयुक्त मालमत्ता यामध्ये फरक ओळखणं खूप गरजेचं आहे. यामुळे मालमत्ता विभागणीच्या वेळी अडचण येणार नाही.
आवश्यक कागदपत्रे जमा करा – घटस्फोटाच्या प्रक्रियेत आर्थिक कागदपत्रांची आवश्यकता अनेक वेळा पडते. त्यामुळे बँकेचे स्टेटमेंट, आयकर विवरणपत्र, प्रॉपर्टीच्या कागदपत्रांची प्रत, कर्ज करारपत्र, गुंतवणुकीचे पुरावे यासारखी महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित गोळा करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
संयुक्त आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा – घटस्फोटाच्या कालावधीत दोघांच्या नावावर असलेल्या खात्यांवर, कर्जावर आणि गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. एकत्र खाते किंवा क्रेडिट कार्डवर अनपेक्षित व्यवहार होऊ नयेत म्हणून नियमितपणे व्यवहार तपासावेत.
बजेट तयार करा- घटस्फोटानंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या थोडा कठीण असू शकतो. त्यामुळे नवीन जीवनशैलीसाठी आपलं मासिक बजेट तयार करणं महत्त्वाचं आहे. यामध्ये घरभाडे, वीज, पाणी, मुलांचे शिक्षण व दैनंदिन खर्च यांचा समावेश करावा. याशिवाय वकील फी, कोर्ट खर्च, भरणपोषण किंवा मुलांच्या खर्चाचा विचार करून राखीव निधी तयार ठेवावा.
आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या – घटस्फोटाच्या प्रक्रियेत योग्य आर्थिक नियोजनासाठी तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. मालमत्ता विभागणी, कर नियोजन, गुंतवणूक व्यवस्थापन यासाठी आर्थिक सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांचा सल्ला घ्या. यामुळे घटस्फोटानंतर आर्थिक स्थैर्य राखता येते.
आपल्या आर्थिक हक्कांची माहिती घ्या – घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये पुरुष किंवा स्त्री दोघांनाही स्वतःच्या आर्थिक हक्कांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. मालमत्तेची विभागणी, भरणपोषण (Alimony), मुलांच्या खर्चाची जबाबदारी यासंबंधी कायदेशीर नियम जाणून घ्या.
स्वतःची स्वतंत्र बँक खाती सुरक्षित करा – घटस्फोटाच्या प्रक्रियेत स्वतःची आर्थिक सुरक्षा ही फार महत्त्वाची असते. त्यामुळे स्वतःच्या नावावर स्वतंत्र बँक खाते उघडणे, सर्व महत्वाच्या आर्थिक खात्यांची पासवर्ड अपडेट करणे आणि आर्थिक व्यवहार सुरक्षीत ठेवणे आवश्यक आहे.
घटस्फोट हा आयुष्यातील महत्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. त्यामुळे घटस्फोट दाखल करण्यापूर्वी आर्थिक, भावनिक आणि पुराव्यांची योग्य तयारी करणे आवश्यक आहे. शांतपणे विचारपूर्वक पावले उचलल्यास पुढील प्रक्रिया सुलभ होते.
यासोबतच योग्य कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वकीलांच्या मार्गदर्शनामुळे आपले हक्क, मालमत्ता वाटणी, मुलांचे पालकत्व यासारख्या मुद्द्यांमध्ये स्पष्टता येते आणि कायदेशीर अडचणी टाळता येतात.अशा वेळी www.asmlegalservices.in , www.knowdivorce.com किंवा www.lifeandlaw.in द्वारे सदर लेख लिहिणाऱ्या ॲड. अब्दुल मुल्ला यांचा सल्ला घेणे महत्वपूर्ण ठरू शकते.
Adv. Abdul Mulla (Mob. No. 937 007 2022) is a seasoned legal professional with over 18 years of experience in advocacy, specializing in diverse areas of law, including Real Estate and Property Law, Matrimonial and Divorce Matters, Litigation and Dispute Resolution, and Will and Succession Planning. read more….
Copyright BlazeThemes. 2025