Loading ...

Life & Law

RECENT NEWS

बक्षीसपत्र: काय आहे आणि ते कसे तयार करावे?(Gift Deed: What Is It and How to Create One?)

बक्षीसपत्र (Gift Deed) एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एक व्यक्ती (दाता) त्याच्या स्व:इच्छेने आणि विचारपूर्वक दुसऱ्या व्यक्तीस (प्राप्तकर्ता) मालमत्तेचे हस्तांतरण करतो. बक्षीसपत्र तयार करताना, त्या मालमत्तेचे स्पष्ट विवरण, दात्याची इच्छा आणि प्राप्तकर्त्याची स्वीकृती यांचा समावेश आवश्यक असतो. हा दस्तऐवज विविध प्रकारच्या मालमत्तेसाठी लागू होऊ शकतो, जसे की स्थावर मालमत्ता (जमीन, घर) किंवा चल मालमत्ता (सोने, गहाण).

बक्षीसपत्र तयार करताना काही महत्त्वाच्या कायदेशीर बाबींचा विचार केला जातो. बक्षीसपत्र तयार करण्याची प्रक्रिया साधी  असली तरी, प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक पाळणे महत्त्वाचे आहे. यामध्ये दात्याची इच्छाशक्ती, प्राप्तकर्त्याची स्विकृती, साक्षीदारांची उपस्थिती आणि नोंदणी यासारख्या बाबींचा समावेश आहे. योग्यरित्या तयार केलेले बक्षीसपत्र कायदेशीर दृष्टिकोनातून वैध ठरते, आणि यामुळे भविष्यात कोणत्याही कायदेशीर वादाची शक्यता टळते. यालेखाचा  उद्देश बक्षीसपत्र म्हणजे काय ,  बक्षीसपत्राची प्रक्रिया, आणि त्यासंबंधी कायदेशीर अटी स्पष्टपणे समजावून देणे आहे.

भारतीय मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, १८८२ नुसार बक्षीसपत्र ( Gift Deed as per the Transfer of Property Act, 1882)

कलम 122: बक्षीसाची व्याख्या (Definition of Gift)

बक्षीस म्हणजे काय?
बक्षीस म्हणजे मालमत्तेचे हस्तांतरण, जे खालील अटींसह केले जाते:

  • बक्षीस फक्त चालू स्थितीत असलेल्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे होऊ शकते.भविष्यातील मालमत्तेचा समावेश बक्षीसात होत नाही.
  • दाता स्वेच्छेने आणि कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याशिवाय बक्षीस करतो.हे हस्तांतरण पूर्णतः दात्याच्या इच्छेवर अवलंबून असते.
  • जो बक्षीस देतो त्याला दाता म्हणतात आणि जो बक्षीस स्वीकारतो त्याला प्राप्तकर्ता म्हणतात 
  • प्राप्तकर्त्याने बक्षीस स्वीकारले पाहिजे, आणि ही स्वीकृती दात्याच्या जीवनकालात केली गेली पाहिजे.जर प्राप्तकर्ता दात्याच्या जीवनकालात किंवा स्वीकृतीपूर्वी मृत झाल्यास, बक्षीस रद्द (Void) ठरते.

बक्षीसपत्राचे महत्वाचे घटक (Essentials of a Gift Deed):

दाता (Donor) आणि प्राप्तकर्ता (Donee):

  • दाता आणि प्राप्तकर्त्याची नाव, पत्ता आणि ओळख निश्चित असावी.
  • दाता कायदेशीर वयाचा आणि मालमत्तेचे मालकी  हक्क असलेला असावा.

निर्बंधमुक्त संमती(Free Consent):

  • बक्षीसपत्र तयार करताना दात्याची स्वेच्छा असावी.
  • कोणत्याही दबाव, फसवणूक किंवा जबरदस्तीशिवाय बक्षीसपत्र तयार केलेले असावे.

मालमत्तेचे वर्णन (Description of Property):

  • हस्तांतरित मालमत्तेचे स्पष्ट आणि संपूर्ण वर्णन असावे.
  • स्थावर मालमत्तेसाठी क्षेत्रफळ, पत्ता, मोजणी क्रमांक इत्यादी नमूद करणे आवश्यक आहे.

बक्षीस विनामोबदला असणे (Without Consideration):

  • बक्षीसपत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला नसावा.
  • हे विनामोबदला केलेले हस्तांतरण असते.

साक्षीदार (Witnesses):

  • बक्षीसपत्रावर दोन साक्षीदारांच्या सह्या असणे बंधनकारक आहे.
  • साक्षीदार विश्वसनीय आणि कायदेशीररित्या पात्र असावेत.

नोंदणी प्रक्रिया (Registration Process):

  • बक्षीसपत्राला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी ते उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • नोंदणीसाठी स्टँप ड्युटी व नोंदणी शुल्क भरले पाहिजे.

हस्तांतरित मालमत्तेचा हक्क (Transfer of Ownership):

  • बक्षीसपत्रावर सह्या झाल्यानंतर आणि नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मालमत्तेचा हक्क प्राप्तकर्त्यास हस्तांतरित होतो.

स्विकृती (Acceptance):

  • प्राप्तकर्त्याने बक्षीस स्वीकारल्याची नोंद बक्षीसपत्रामध्ये असावी.
  • स्विकार झाल्याशिवाय बक्षीस वैध ठरत नाही.

कलम 123: बक्षीस हस्तांतरणाची पद्धत (Mode of Transfer)

  • स्थावर मालमत्ता: नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे हस्तांतरण आवश्यक.
  • दस्तऐवजावर दात्याची स्वाक्षरी आणि किमान दोन साक्षीदारांची सही आवश्यक.
  • जंगम मालमत्ता: नोंदणीकृत दस्तऐवज किंवा प्रत्यक्ष सुपूर्तीद्वारे हस्तांतरित केली जाऊ शकते.

कलम 124: विद्यमान व भावी मालमत्तेचा बक्षीस (Existing and Future Property)

  • विद्यमान व भावी मालमत्तेच्या एकत्रित बक्षीसामध्ये, भावी मालमत्तेसाठी बक्षीस अवैध ठरते.

कलम 125: एकापेक्षा अधिक प्राप्तकर्त्यांसाठी बक्षीस (Gift to Several Donees)

  • दोन किंवा अधिक प्राप्तकर्त्यांना दिलेले बक्षीस, त्यातील एखाद्याने ते नाकारल्यास, त्याच्या वाट्यासाठी बक्षीस अवैध ठरते.

कलम 126: बक्षीस निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार (Suspension or Revocation of Gift)

  • दाता व प्राप्तकर्ता ठरविलेल्या अटींवर बक्षीस निलंबित किंवा रद्द करू शकतात.
  • परंतु, दात्याच्या इच्छेनुसार बक्षीस रद्द करता येत असल्यास, ते पूर्णपणे किंवा अंशतः अवैध ठरते.
  • बक्षीस करारासारख्या परिस्थितीत रद्द होऊ शकते ,पण केवळ मोबदल्याच्या अभावामुळे रद्द करता येत नाही

कलम 127: भारयुक्त बक्षीस (Onerous Gift)

  • एखाद्या बक्षीसामध्ये लाभदायक व बोजाच्या मालमत्तेचा समावेश असल्यास, संपूर्ण स्वीकार आवश्यक आहे. 
  • स्वतंत्र हस्तांतरण असल्यास, प्राप्तकर्ता लाभदायक बक्षीस  स्वीकारू शकतो व बोजाचे बक्षीस  नाकारू शकतो.
  • असक्षम  प्राप्तकर्ता: दायित्व असलेली मालमत्ता स्वीकारल्यास जबाबदारी लागू होत नाही, परंतु कायदेशीर पात्र झाल्यावर ती लागू होते. 

कलम 128:सर्वसमावेशक बक्षीस प्राप्तकर्ता (Universal Donee)

  • जर बक्षीसामध्ये दात्याची संपूर्ण मालमत्ता असेल, तर प्राप्तकर्ता दात्याच्या सर्व कर्ज व दायित्वांसाठी जबाबदार ठरतो.

कलम 129: अपवाद (Exceptions)

  • मृत्यूच्या कल्पनेतून दिलेले बक्षीस (Donations Mortis Causa): या प्रकारच्या बक्षीसाला या कलमांमध्ये सवलत आहे.
  • मुस्लिम कायदा: या कलमांमध्ये मुस्लिम कायद्याचे बक्षीस नियम प्रभावित होत नाहीत.

बक्षीसपत्र तयार करण्याची प्रक्रिया (Process of Drafting a Gift Deed)

बक्षीसपत्र (Gift Deed) तयार करण्याची प्रक्रिया साधारणपणे काही महत्त्वाच्या टप्प्यात पूर्ण केली जाते. प्रत्येक टप्प्यात योग्य प्रकारे निर्णय घेणे आवश्यक आहे. बक्षीसपत्र तयार करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे –

1. दात्याची (Donor) आणि प्राप्तकर्त्याची (Donee) माहिती गोळा करा

  • बक्षीसपत्र तयार करतांना, दात्याची आणि प्राप्तकर्त्याची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. यामध्ये, त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, ओळखपत्र क्रमांक, आणि इतर संबंधित तपशील असावेत.
  • या माहितीमुळे बक्षीसपत्र कायदेशीर आणि वैध ठरते.

2. मालमत्तेचे स्पष्ट विवरण (Property Description)

  • बक्षीसपत्रात हस्तांतरण केलेली मालमत्ता स्पष्टपणे सांगितली पाहिजे. उदाहरणार्थ, जर बक्षीस स्थावर मालमत्ता (जमीन, घर) असेल, तर त्याचे क्षेत्रफळ, जागेचे स्थान, आणि इतर तपशील दिले पाहिजेत.
  • चल मालमत्ता असल्यास, त्याचा प्रकार (उदाहरणार्थ, वाहन, सोने, इ.) तपशीलवार लिहा.

3. दात्याची इच्छाशक्ती (Donor’s Willingness)

  • बक्षीसपत्रात दात्याची इच्छा व्यक्त करणे आवश्यक आहे. त्याने कोणत्याही प्रकारचा दबाव न घेत, स्वेच्छेने मालमत्तेचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • यासाठी, दात्याची स्वाक्षरी आवश्यक आहे, ज्यामुळे त्याची इच्छा स्पष्ट होईल.

4. प्राप्तकर्त्याची स्वीकृती (Donee’s Acceptance)

  • बक्षीस स्वीकारण्यासाठी प्राप्तकर्त्याची स्वीकृती आवश्यक आहे. प्राप्तकर्ता त्याला दिलेले बक्षीस स्वीकारतो याची स्पष्टता देणारी भाषा वापरणे आवश्यक आहे.
  • प्राप्तकर्त्याच्या स्वाक्षरीद्वारे त्याने बक्षीस स्वीकारले की नाही, हे निश्चित होते.

5. साक्षीदारांची उपस्थिती (Witnesses’ Presence)

  • बक्षीसपत्रावर किमान दोन साक्षीदारांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. साक्षीदार या दस्तऐवजाच्या सत्यतेसाठी महत्वाचे असतात.
  • साक्षीदारांची माहिती (नाव, पत्ता) देखील बक्षीसपत्रावर दिली पाहिजे.

6. नोंदणी (Registration)

  • जर बक्षीस स्थावर मालमत्तेचे असेल, तर ते नोंदणी करावे लागते 
  • बक्षीसपत्र नोंदवताना स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यानंतर बक्षीसपत्र अधिकृत ठरते.

7. स्टॅम्प ड्युटी आणि शुल्क (Stamp Duty & Charges)

  • बक्षीसपत्रावर स्टॅम्प ड्युटी लागू असते. स्थावर मालमत्तेचे बक्षीस असताना, स्टॅम्प ड्युटी भरणे बंधनकारक आहे.  
  • स्टॅम्प ड्युटीचे प्रमाण राज्यानुसार बदलते, त्यामुळे स्थानिक कायद्याचा विचार करा.

8. बक्षीसपत्राचे वितरण (Distribution of Gift Deed)

  • बक्षीसपत्र तयार झाल्यावर, त्याची प्रत दात्याला, प्राप्तकर्त्याला, आणि साक्षीदारांना दिली जाते.
  • यामुळे सर्व संबंधित पक्षांना कायदेशीर अधिकार प्राप्त होतात.

9. बक्षीसपत्राची अंमलबजावणी (Implementation of Gift Deed)

  • बक्षीसपत्र नोंदवल्यानंतर, प्राप्तकर्त्याला बक्षीस मिळालेल्या मालमत्तेवर सर्व अधिकार मिळतात.
  • बक्षीस मिळालेल्या मालमत्तेचा उपयोग किंवा हस्तांतरण प्राप्तकर्ता त्याच्या इच्छेनुसार करू शकतो.

बक्षीसपत्र तयार करताना होणाऱ्या सामान्य चुका (Common Mistakes While Drafting a Gift Deed)

अपूर्ण किंवा चुकीची माहिती देणे: दाता आणि प्राप्तकर्ता यांची अचूक आणि पूर्ण माहिती आवश्यक आहे. चुकीची माहिती बक्षीसपत्राची कायदेशीर किंमत कमी करते . 

साक्षीदारांचा अभाव: बक्षीसपत्र कायदेशीर ठरवण्यासाठी किमान दोन साक्षीदारांची आवश्यकता असते. साक्षीदारांशिवाय बक्षीसपत्र अमान्य ठरते.

नोंदणी न करणे: स्थावर मालमत्तेचे बक्षीस देताना नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केल्यास बक्षीस अमान्य ठरते.

दात्याच्या स्वेच्छेचा अभाव: बक्षीस दात्याच्या पूर्ण स्वेच्छेने केले जावे लागते. दबावाखाली केलेले बक्षीस कायदेशीर मानले जात नाही.

वकीलांचा सल्ला न घेणे: बक्षीसपत्र तयार करताना कायदेशीर सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.वकिलांचा सल्ला न घेणे हे बक्षीसपत्रात चुका होण्याची शक्यता वाढवते 

स्पष्ट अटींचा अभाव: बक्षीसपत्रात हस्तांतरणाच्या अटी स्पष्टपणे नमूद कराव्यात, अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात.

मालमत्तेचे संपूर्ण विवरण देणे टाळणे: हस्तांतरण होणाऱ्या मालमत्तेचे तपशील पूर्ण आणि स्पष्ट नसल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते.

करदायित्वाचा विचार न करणे: बक्षीसपत्र तयार करताना कराची तपशीलवार माहिती असावी, विशेषतः मोठ्या मूल्याच्या बक्षीसावर कर लागतो.

मालमत्ता हस्तांतरण योग्य पद्धतीने न करणे: बक्षीसपत्राद्वारे मालमत्तेचे योग्य हस्तांतरण आवश्यक आहे. योग्य पद्धतीने हस्तांतरण न केल्यास बक्षीस अमान्य ठरते.

मुस्लिम कायद्यातील अपवाद लक्षात न घेणे: मुस्लिम कायद्यानुसार बक्षीस (हिबा) साठी ताबा ताबडतोब हस्तांतरित करणे आवश्यक आहे. तसेच, साक्षीदारांच्या उपस्थितीतच हस्तांतरण करणे आवश्यक आहे.

बक्षीसपत्र तयार करताना काय काळजी घ्यावी (Precautions to Take While Drafting a Gift Deed)

बक्षीसपत्र तयार करताना, कायदेशीरदृष्ट्या वैध आणि अडचणींमधून मुक्त ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. बक्षीसपत्राला कायदेशीर रूप देताना, त्यातली छोटीशी चूक देखील मोठ्या अडचणींचा सामना करु शकते.बक्षीसपत्र तयार करताना खालील बाबींची काळजी घ्यावी.

1. माहितीची अचूकता सुनिश्चित करा

बक्षीसपत्र तयार करताना, दाता आणि प्राप्तकर्ता यांची अचूक माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात, दोन्ही व्यक्तींची पूर्ण नावे, पत्ते, आणि इतर ओळख योग्यपणे दिली पाहिजे. याशिवाय, हस्तांतरित मालमत्तेची पूर्ण, अचूक आणि स्पष्ट माहिती असावी लागते. उदाहरणार्थ, मालमत्तेच्या स्थानाचा, क्षेत्रफळाचा, किंवा अन्य विशेष गुणधर्मांचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे बक्षीस कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरू शकते.

2. साक्षीदारांची योग्य निवड करा

बक्षीसपत्रासाठी दोन साक्षीदारांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. या साक्षीदारांची निवड खूप महत्त्वाची आहे, कारण त्यांची स्वाक्षरी बक्षीसपत्राच्या वैधतेसाठी आवश्यक असते. साक्षीदार आपले काम योग्य पद्धतीने करणाऱे , विश्वासार्ह आणि योग्य असावेत. साक्षीदारांच्या सर्व  माहितीची नोंद असणे आवश्यक आहे. 

3. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा

बक्षीसपत्राच्या वैधतेसाठी नोंदणी अत्यंत आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा हस्तांतरण स्थावर संपत्तीसंबंधी आहे. बक्षीसपत्राची नोंदणी न केल्यास ते कायदेशीरदृष्ट्या अमान्य होऊ शकते. नोंदणी करण्याची प्रक्रिया कायद्यानुसार योग्य पद्धतीने पार पाडणे महत्त्वाचे आहे, ज्यात स्टॅम्प ड्युटी भरणे, नोंदणी कचेरीत बक्षीसपत्र सादर करणे आणि योग्य पद्धतीने त्यावर साक्षीदारांची स्वाक्षरी घेणे यांचा समावेश आहे.

4. वकीलांची मदत घ्या

बक्षीसपत्र तयार करताना वकीलाची मदत घेतल्यास, दस्तऐवजाच्या कायदेशीर बाबी अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित होतात. वकील कायदेशीर सल्ला देऊन, कायदेशीरदृष्ट्या बक्षीसपत्र तयार करणे सुनिश्चित करतात. कधी कधी लोक बक्षीसपत्र तयार करताना, त्यात काही चुकीचे प्रावधान ठेवतात, जे भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण करु शकतात. यासाठी तज्ञ वकीलाची मदत घेणे अधिक सुरक्षित ठरते.अशा वेळी www.asmlegalservices.in आणि www.lifeandlaw.in द्वारे सदर लेख लिहिणाऱ्या प्रॉपर्टी तज्ञ  वकीलांचा कायदेशीर सल्ला घेतल्यामुळे अचूक बक्षीसपत्र तयार करता येईल

5. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करा

बक्षीसपत्र तयार करताना, त्या संबंधित मालमत्तेचे सर्व कायदेशीर कागदपत्र तयार करणे महत्त्वाचे आहे. हे कागदपत्रे दस्तऐवजाच्या वैधतेला पुष्टी देतात. उदाहरणार्थ, स्थावर मालमत्तेसाठी सर्व नोंदणी कागदपत्रे, कर आकारणीचे दस्तऐवज, टॅक्स रिटर्न्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात. त्याशिवाय, बक्षीसपत्राला योग्य स्टॅम्प ड्युटी देणे आणि त्याची नोंदणी करून देणे आवश्यक आहे.

6. बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र यामध्ये गोंधळ टाळा

कधी कधी लोक बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र यामध्ये गोंधळ करतात. यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. मृत्यूपत्र मृत्यूनंतर प्रभावी होते, आणि बक्षीसपत्र ताबडतोब लागू होणारे हस्तांतरण आहे. याचा अर्थ बक्षीसपत्राचे कायदेशीर अधिकार ताबडतोब लागू होतात, जे मृत्यूनंतर नाही. यासाठी, दोन्ही कागदपत्रे योग्यरीत्या भेदून आणि त्यांचे उद्देश समजून वकिली सल्ला घेणे आवश्यक आहे.

7. कायदेशीर शर्ती आणि अटींचे पालन करा

बक्षीसपत्र तयार करताना कायदेशीर शर्ती आणि अटींचे पालन करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बक्षीसपत्रात वापरलेले शब्द, शर्ते, आणि समर्पित केलेल्या मालमत्तेच्या बाबतीत सर्व कायदेशीर प्रावधानांचे पालन करा. काही ठराविक अटींचे उल्लंघन केल्यास, बक्षीसपत्र वैधतेसाठी हानीकारक ठरू शकतात 

समारोप

बक्षीसपत्र तयार करणे एक कायदेशीर प्रक्रियेचे काम आहे, ज्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर दक्षता घेणे आवश्यक आहे. योग्य प्रकारे तयार केलेले बक्षीसपत्र व्यक्तीच्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी कायदेशीर सुरक्षा प्रदान करते आणि भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळते. दात्याची इच्छाशक्ती, प्राप्तकर्त्याची स्वीकृती आणि साक्षीदारांची उपस्थिती सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे बक्षीसपत्र वैध ठरते.

तरीही, बक्षीसपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणतीही शंका किंवा कायदेशीर मुद्दे असल्यास, तज्ञ कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक अनुभव असलेला वकील आपल्या बक्षीसपत्राशी संबंधित सर्व कायदेशीर अटी आणि प्रक्रियेचे योग्य मार्गदर्शन करू शकतो, ज्यामुळे भविष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये..यासाठी आपण www.asmlegalservices.in आणि www.lifeandlaw.in द्वारे सदर लेख लिहिणाऱ्या प्रॉपर्टी तज्ञ  वकीलांचा कायदेशीर सल्ला घेऊन अचूक बक्षीसपत्र बनवू शकता. 

RECENT POSTS

CATEGORIES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Life And Law Blogs

Life & law provides valuable insights by simplifying complex legal concepts and connecting them to real-life experiences …read more

Why I write

At Life & law, my mission is simple. to make the law accessible and empower people with knowledge to confidently face life’s challenges …read more

Copyright BlazeThemes. 2025