Trending
कला ही मानवी मनाच्या कल्पकतेचे आणि अभिव्यक्तीचे स्वरूप आहे. प्रत्येक कलाकार आपली कला सादर करताना केवळ रंग, रेषा किंवा शब्द वापरत नाही, तर त्याच्या भावना, अनुभव आणि विचार या साऱ्यांची गुंफण करत असतो. ही सर्जनशीलता म्हणजेच त्या कलाकाराची ओळख आणि बौद्धिक संपत्ती असते. त्यामुळेच त्या कलेचं आणि कलाकाराच्या हक्कांचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक ठरतं – आणि हे संरक्षण देण्याचं काम कायद्याचं आहे.
कायदा हा कलाकारांसाठी एक मजबूत आधारस्तंभ आहे. तो कलाकाराच्या मूळ कल्पना, रचना आणि कलाकृती यांचं कॉपीराइट, बौद्धिक संपत्ती हक्क, आणि नैतिक अधिकार यांच्याद्वारे संरक्षण करतो. यामुळे कलाकृतींचा अनुचित वापर, चोरी किंवा शोषण टाळलं जातं. या लेखाचा उद्देश कला आणि कायदा यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्याबद्दल माहिती देणे जिथे कायदा कलाकाराच्या सर्जनशीलतेला सुरक्षा आणि सन्मान प्रदान करतो यावर प्रकाश टाकणे आहे.
जागतिक कला दिन हा दिवस कला आणि तिच्या महत्त्वाचा जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो, कारण याच दिवशी लिओनार्डो दा विंची यांचा जन्म झाला. युनेस्को ने 2012 मध्ये जागतिक कला दिन सुरू केला, ज्याचा उद्देश कला क्षेत्रातील सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, कलेच्या महत्वावर लक्ष केंद्रित करणे आणि समाजातील विविधता आणि सांस्कृतिक बदलांच्या संदर्भात तिचा योगदान साजरा करणे आहे.
जागतिक कला दिनाचा मुख्य उद्देश लोकांना कला आणि कलाकारांच्या योगदानाची ओळख करून देणे आहे. यामुळे कला ही केवळ सौंदर्यशास्त्राच्या बाबतीतच नाही, तर शिक्षण, सांस्कृतिक आदान-प्रदान, आणि समाजाच्या कल्याणासाठी किती महत्त्वाची आहे हे समजून दिले जाते. या दिवसाच्या निमित्ताने, कलाकारांच्या कलेचे संरक्षण आणि त्यांच्या हक्कांचे महत्त्व देखील लोकांसमोर आणले जाते, जेणेकरून कलाकार त्यांचे कार्य शोषित होण्याची चिंता न करता मुक्तपणे सर्जनशीलतेला चालना देऊ शकतील.
भारतीय संविधानामध्ये कलाकारांसाठी महत्त्वाचे मूलभूत अधिकार दिले आहेत. कलम 19(1)(a) नुसार प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे, ज्यामध्ये कलाकार आपली कला, मते, भावना चित्र, नाट्य, संगीत, लेखन किंवा इतर सर्जनशील माध्यमांतून व्यक्त करू शकतात. मात्र, या स्वातंत्र्यावर काही मर्यादा असतात जसे की सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि राष्ट्रीय सुरक्षा. कलम 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य देतं, जे कलाकारांना भीतीविना आणि प्रतिष्ठेने जगण्याचा हक्क प्रदान करतं. कलम 14 नुसार, सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान आहेत, त्यामुळे कलाकारांवर कोणताही भेदभाव न करता त्यांना न्याय मिळू शकतो.
कॉपीराइट कायदा हा कलाकारांचा सर्वात मूलभूत कायदा आहे. हा कायदा कलाकृतीवर त्या कलाकाराचे अधिकार सुरक्षित करतो. जसे की लेख, कविता, संगीत, नाटके, चित्र, छायाचित्रे, चित्रपट, संगणक प्रोग्रॅम्स इ. यांवर कॉपीराइट मिळतो. एकदा कलाकृती तयार झाली की, कॉपीराइट आपोआप निर्माण होतो आणि कलाकारास त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा हक्क मिळतो. कलाकारांना त्यांच्या कलाकृतीवर आर्थिक हक्क (उदा. रॉयल्टी) तसेच नैतिक हक्क (त्यांचं नाव त्याच कलाकृतीशी जोडणं, चुकीचा वापर टाळणं) मिळतात.
जर एखादा कलाकार स्वतःचा खास ब्रँड तयार करतो – जसं की विशिष्ट स्वाक्षरी, लोगो, शैली – तर तो ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत त्याचं नोंदणीकरण करू शकतो. यामुळे त्या चिन्हाचा दुसऱ्यांनी वापर करता येत नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्या कलाकाराने स्वतःचं नाव, सिग्नेचर स्टाईल किंवा विशिष्ट डिझाईन तयार केलं असेल, तर ट्रेडमार्क त्याचं अधिकृत संरक्षण करतो. हे विशेषतः व्यावसायिक कलाकार, स्टुडिओ, डिजिटल आर्टिस्ट्स यांच्यासाठी उपयुक्त आहे.
डिझाईन कायदा त्या कलाकारांसाठी आहे जे नाविन्यपूर्ण डिझाईन्स तयार करतात – जसं की फॅशन डिझायनर, ज्वेलरी डिझायनर, किंवा हस्तकला उत्पादक. या कायद्यानुसार वस्तूंचा आकार, नमुना, सजावट यावर आधारित डिझाईन्स नोंदवून त्यांचं संरक्षण करता येतं. ही नोंदणी झाल्यावर इतर कोणी ती डिझाईन कॉपी करू शकत नाही. त्यामुळे, ही कला आर्थिक दृष्टीने सुरक्षित राहते आणि डिझायनरला बाजारात स्पर्धात्मक फायदा मिळतो.
भारतात अनेक पारंपरिक कला प्रांतविशेष असतात – उदा. वारली चित्रकला (महाराष्ट्र), मधुबनी (बिहार), कोल्हापुरी चपला इत्यादी. अशा पारंपरिक कलेला विशिष्ट भौगोलिक क्षेत्राशी जोडणारा GI Tag मिळतो. हा टॅग मिळाल्याने त्या विशिष्ट कलेचा किंवा उत्पादनाचा चुकीचा वापर किंवा बनावट विक्री रोखता येते. कलाकारांना त्यामुळे ओळख, सन्मान आणि व्यावसायिक हक्क मिळतात.
डिजिटल युगात कलाकार त्यांच्या कलाकृती ऑनलाईन माध्यमांद्वारे प्रसिद्ध करतात. त्यामुळे डिजिटल चोरी, फेक अकाउंट्स, छायाचित्र बदल, सायबरबुलींग यांसारख्या त्रासांचा धोका वाढतो. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई करता येते. कलाकार त्यांचे डिजिटल हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी याचा उपयोग करू शकतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याने तुमचं चित्र परवानगीशिवाय वापरलं, तर ते सायबर गुन्हा ठरतो.
भारतीय करार कायदा कलाकारांच्या सर्जनशील कामावर तत्त्वत: प्रभाव टाकतो. जसे की, कलाकार आणि एखाद्या संस्था किंवा व्यक्ती यांच्यात करार होतो, तर तो करार योग्य असावा लागतो. उदाहरणार्थ, चित्रकार, संगीतकार किंवा लेखक एखाद्या चित्रपट निर्मात्याशी करार करतो, तर त्यात स्पष्टपणे कलाकृतींच्या हक्कांचा आणि फायदेशीर वाटपाचा उल्लेख असावा लागतो. करार कायद्यामुळे, कलाकारांना त्यांच्या कलाकृतीवर संमतीनुसार आणि कायदेशीरपणे अधिकार मिळतात. हा कायदा कलाकारांना संरक्षण देतो आणि त्यांना वचनबद्ध करतो की संबंधित कराराचे उल्लंघन न करता त्यांची कामे करावी लागतील.
कला ही केवळ सौंदर्याचा किंवा सर्जनशीलतेचा विषय नसून, ती कलाकाराच्या मेहनतीची, विचारांची आणि भावनांची अभिव्यक्ती असते. त्यामुळे कलाकारांच्या कलाकृतींचं संरक्षण करणे ही समाजाची आणि कायद्याची नैतिक जबाबदारी ठरते. बौद्धिक संपत्ती हक्क, कॉपीराइट कायदे, डिज़िटल युगातील संरक्षणाच्या तरतुदी अशा विविध मार्गांनी कायदा कलाकारांच्या पाठीशी उभा असतो. हे नातं जितकं सखोल समजून घेतलं जाईल, तितकीच कला सुरक्षित आणि अभिव्यक्त होण्यास मोकळी राहील. कला सुरक्षित असेल तरच ती मुक्तपणे फुलू शकते, आणि यासाठी कायदा हा तिचा विश्वासू मित्र ठरतो.
Adv. Abdul Mulla (Mob. No. 937 007 2022) is a seasoned legal professional with over 18 years of experience in advocacy, specializing in diverse areas of law, including Real Estate and Property Law, Matrimonial and Divorce Matters, Litigation and Dispute Resolution, and Will and Succession Planning. read more….
Copyright BlazeThemes. 2025